बेंगलोर/दै.मूलनिवासी
ओडिसा राज्यातील काँग्रेसच्या आमदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी लाच दिल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केला आहे. ओडिसा काँग्रेसच्या 8 आमदारांना 5 कोटींची ऑफर दिल्याकारणावरून 5 जणांना अटक केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र, त्याआधीच कर्नाटकमध्ये धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. ओडिशामधील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.
ओडिसा मधील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच काँग्रेसच्या 8 आमदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची लाच दिल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केला आहे. या प्रकरणात बेंगलोर पोलिसांकडून एका हॉटेलमधून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन लोटसच्या या प्रयत्नामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आज 16 मार्च रोजी राज्यसभेसाठी ओडिसात मतदान होत आहे.
ओडिसातील काँग्रेसच्या 14 पैकी 8 आमदारांना बेंगलोर येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आरोप केला आहे की, 4 ते 5 लोकांनी या हॉटेलमध्ये घुसून काँग्रेस आमदारांना 5 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे आणि क्रॉस व्होटिंगसाठी दबाव टाकला आहे. या आरोपींवर एफआयआर दाखल झाल्यानंतर बेंगलोर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आले आहे.
ओडिसातील कोरापुटचे खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी ओडिसाच्या राउरकेला येथील आहेत. त्यांच्याकडे कोरे चेक सापडले आहेत. तर चौकशीत त्यांनी भाजप समर्थक अपक्ष उमेदवार दिलीप राय यांचे नाव घेतल्याचे समजते आहे. ज्या हॉटेलमध्ये हे आमदार थांबले होते, ते हॉटेलदेखील दिलीप राय यांच्या मालकीचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ओडिसामध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी 5 उमेदवार निवडणुकीत उभे आहेत.
भाजपकडून मनमोहन सामल आणि सुजीत कुमार हे निवडणुकीत उभे आहेत. तर, बिजू जनता दलाकडून संतृप्त मिश्रा आणि भाजपचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार दिलीप राय हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांकडून काँग्रेस-सीपीएमचा पाठिंबा असलेले दत्तेश्वर होता हे उमेदवार आहेत. चौथ्या जागेसाठी दोन अपक्षांमध्ये मोठी लढत होणार आहे. त्यासाठीच भाजपा सरकारचे आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. भाजप पैशाचा वापर करून निवडणुका जिंकत आहे. काँग्रेसच्या आमदारांना धमकावण्यात आले आहे. असा आरोप ओडिसा काँग्रेस अध्यक्ष भक्त चरण दास यांनी केला आहे.


